Thursday , December 8 2022
Breaking News

मालेगाव महानगर पालिकेत मनमानी कारभार- मालेगाव विधेयक संघर्ष समिती

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य

मालेगाव (१७ नोव्हेंबर  २०२२) – महानगर पालिकेच्या वतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शहरातील पश्चिम भागात प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून दिला जात नाही .या विरोधात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय ना. श्री. भुसे साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी दोन माजी उपमहापौर यांच्या नेतृत्वखाली  दि. १५/११/२२ रोजी दुपारी ताळा ठोको आंदोलन करत मनपा प्रभाग कार्यालयाची तोडफोड केली. प्रशासना विरुद्ध आंदोलन झाले पाहिजे, सनदशीर मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. आंदोलने हे जिवंत लोकशाहीचे प्रतीक आहे. परंतु आंदोलनात शासकीय मालमत्तेचे नुकसान ( जनतेच्या कर रुपी पैशांतून निर्माण झालेल्या ) करणे कितपत योग्य आहे ?

          सध्या मालेगाव महानगर पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त श्रीमान भालचंद्र गोसावी साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनावर थेट नियंत्रण शासनाचे आहे. शासनात मालेगाव बह्याचे आमदार श्री. भुसे साहेब महत्त्वाच्या जबाबदारीवर आहेत. तसेच ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत .म्हणून मनपा प्रशासन त्यांच्या अधिपत्त्याखाली येते. त्यामुळे शिवसैनिकांनी काल केलेले आंदोलन हे सरळ सरळ माननीय मंत्री महोदय यांना आरसा दाखवणारे व सरकारला घराचा आहेर देणारे होते.

        माननीय मंत्री महोदय जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नाशिक महानगर पालिकेत जाऊन त्यांनी तेथील आयुक्त व प्रशासक यांना कडक शब्दात तंबी देऊन समस्या सोडविण्यासाठी आदेश दिले होते. मग मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तांना तसे आदेश ते का देत नाहीत ? त्यांच्या कार्यकर्त्यांना मनपा कार्यालयात जाऊन ताळा ठोको आंदोलन व तोडफोड का करावी लागली ? मनपा प्रशासक गोसावी साहेब हे त्यांच्या विशेष मर्जीतील अधिकारी आहेत. मनपा आयुक्त पदावर IAS अधिकारी नियुक्त होत असताना, त्यांना थांबवून गोसावी साहेब यांना कार्यरत ठेवले मग हे गोसावी साहेब मा. पालकमंत्री महोदय यांचे ऐकत नाही का ? जसे दोन दिवसापूर्वी IPS आधिकारी मालेगावात अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्त करण्यात आले .परंतु तत्काळ त्यांची नियुक्ती रद्द करून राज्य पोलीस सेवेतील अधिकारी नियुक्ती आदेश राज्य सरकारने दिले त्याप्रमाणे गोसावी साहेब हे पालकमंत्री महोदय यांचे ऐकत नसतील, तर त्यांना तत्काळ बदली करून सक्षम व विशेष मर्जीतील अधिकारी नियुक्त करून घेणे सहज शक्य असताना ते का केले जात नाही ?

           मनपा अंदाजपत्रक मार्च महिन्यात तयार करण्यात आले होते, त्याला महासभा मंजुरी देखील देण्यात आली होती. अंदाजपत्रक मंजूर केल्यावर तत्काळ लागू करणे आवश्यक असते परंतु मनपात राजकीय व आर्थिक हितासाठी सवडीप्रमाणे ते लागू केले जाते. १५ जून २०२२ नंतर मालेगाव महानगर पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली, तो पर्यंत मा. मंत्री महोदय यांच्या अधिपत्याखाली  आंदोलनाचे नेतृत्व करणारे उपमहापौर निलेश आहेर हे सत्तेत होते. त्यामुळे बजेट मंजुरी नंतर दोन महिन्यांचा कालावधी हातात असताना पश्चिम भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी का उपलब्ध करून घेतला नाही. यावरून हे आंदोलन खरंच जनतेच्या हितासाठी होते की नाही, हा प्रश्न निर्माण होतो.

           आंदोलनात ४० वर्षापेक्षा जास्त काळापासून नगरसेवक म्हणून कामकाज करत असलेले जेष्ठ नेते माजी उपमहापौर आदरणीय श्री. सखाराम दादा घोडके साहेब यांनी आयुक्तांच्या कामकाज पद्धतीवर जाहीर टीका केली. ती बघता आयुक्त व प्रशासक गोसावी साहेब किती मनमर्जी कामकाज करतात, हे लक्षात येते. आयुक्तांच्या कामकाज पद्धतीवर अनेक वेळा अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी जाहीर टीका केली आहे. पण त्याची दखल घेण्याची गरज मा. मंत्री महोदय यांना वाटली नाही. परंतु आतातर अतिशय जबाबदार व्यक्ती आयुक्त गोसावी साहेब यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत असल्याने त्याला मा. पालकमंत्री महोदय हे गंभीरतेने घेतील अशी आशा आहे.

                शहराच्या हितासाठी मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने गेल्या २१ वर्षात दोन ते अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नियोजनाच्या अभावामुळे आजही शहर समस्यांनी ग्रस्त आहे. दर वर्षी करोडोचा निधी उपलब्ध होतो पण कामाची गुणवत्ता नसल्याने तो जनतेच्या हिताचा व उपयोगी ठरत नाही. अनेक नगरसेवक हे ठेकेदार व अनेक अधिकारी भागीदार झाल्याने मनपाची खुली लूट सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की आरोप प्रत्यारोप करत प्रशासनाला धारेवर धरायचे नंतर सर्व मिळून मलीदा लाटायच हा प्रकार सर्रास सुरू असतो.

             आंदोलनाची दखल घेत आदरणीय पालकमंत्री महोदय श्रीमान भुसे साहेब मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्त पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात….

           निखिल बाळासाहेब पवार
*आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती*

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: