Saturday , December 3 2022
Breaking News

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली

मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र

नाशिक(३ नोव्हेंबर २०२२) : माधवराव मोरे यांनी १९८० -८१ च्या काळात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करून शेतमालाला रास्त भाव मिळावाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारले होते. आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्र सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती.

ऊस आणि कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रभर शरद जोशी व माधवराव मोरे यांच्या नेतृत्वात रेल रोको, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन चिरडण्यासाठी त्यावेळी सरकारकडून लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार करण्यात आला होता. लाठीमारात माधवराव मोरे यांना एसआरपी फोर्सने लक्ष्य केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तरीही शेतकरी आंदोलनाची धार कमी न होता वाढतच गेली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी शरद जोशी व माधवराव मोरे यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. प्रकृतीच्या कारणास्तव माधवराव मोरे यांनी १९९६ पासून शेतकरी आंदोलनातून माघार घेतली होती. तरीही ते शेवटपर्यंत संंघटनेच्या विचारांशी बांधील होते. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते.

ऊसाला भाव मिळावा म्हणून नाशिकला  शेतकऱ्यांचा  मोठा लढा झाला. त्यात पिंपळगाव बसवंत  येथे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको झाला. त्यात वाहतूक ठप्प झाली. यावेळी एक खासदार  गाडीतून उतरून नेत्यांकडे वाहतूक कोंडी बाबात विचारणा करू लागले. यावेळी लढ्याचे नेतृत्व करीत असलेल्या माधवराव मोरे यांनी चक्कया खासदाराच्या कानशीलात लगावली. त्यामुळे हे आंदोलन आणि मोरे यांची चर्चा राज्यभरात पसरली.

(कै) शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचा विस्तार झाला, त्यात नाशिकचे मोठे योगदान आहे. या योगदानामध्ये निफाड तालुक्यात झालेला ऊस दराचा शेतकरी लढा शेतकरी संघटनेच्या इतिहासातील प्रमुख लढा मानला जातो. त्यात अगदी निफाडचे (खेरवाडी) रेल्वे स्थानक देखील पेटवून देण्यात आले होते.

याबाबत एक चर्चा आजही सांगितली जाते, ती अशी, या लढ्याचे नेतृत्व विविध नेत्यांपैकी माधवराव खंडेराव मोरे यांच्याकडे देखील होते. माधवराव मोरे हे लढाऊ आणि आक्रमक स्वभावाचे होते. त्याचा प्रत्यय चक्क एका खासदारालाही आला. १९८० मध्ये शेतकरी संघटनेतर्फे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको झाला. हजारो शेतकरी त्यात सहभागी झाल्याने दिल्लीला जाणारा महामार्ग ठप्प झाला. रस्त्यावर मैलभर लांब वाहनांच्या रांगा होत्या.
यावेळी मालेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार नाशिकहून आपल्या मतदारसंघाकडे जात होते. ते रास्ता रोकोत अडकले. त्यामुळे ते वाहनातून उतरले. ते चालत पुढे जात होते. यावेळी ते शेतकऱ्यांकडे आंदोलनाबाबत चर्चा करत होते. त्यांची भेट श्री. मोरे यांच्याशी झाली. त्यांनी हात जोडले अन् आंदोलनाबाबत विचारणा केली. त्यांना समोरून अनपेक्षीत प्रतिसाद मिळाला. संतप्त मारे यांनी चक्क त्यांच्या कानशीलात लगावली. त्यामुळे वातावरण एकदम गंभीर झाले. पोलिसांनी खासदारांना तेथून दूर नेले अन् पुढचा प्रसंग टळला. मात्र त्यानंतर हे खासदार अनेकदा चर्चेत अनेकांना स्वतः या प्रसंगाबाबत सांगत असत.
या प्रसंगामुळे शेतकरी संघटनेचा लढा चर्चेत होताच. त्यानंतर माधवराव मोरे यांची चर्चा राज्यभर झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भल्या भल्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवणारे माधवराव मोरे हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांचे हक्क व आर्थिक विकासासाठी व त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी झटत राहिले.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक लढा उभारणारे माधवराव मोरे यांची प्रकृती गेली दोन वर्षांपासून खालावली होती. शेतकऱ्यांसाठी छेडलेल्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या लाठ्याचे घाव त्यांना वार्धक्यात असह्य होत होते. पिंपळगाव बसवंतमध्ये १९८० मध्ये कांदा व उसाला हमीभाव मिळावा, यासाठी झालेल्या आंदोलनात शेतकरी व पोलिस यांच्यात धुमचक्री झाली. आंदोलनात गोळीबार झाला; पण ते मागे हटले नाही.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: