Sunday , November 27 2022
Breaking News

सरकारी जागेतील मौल्यवान सागवान वृक्षाची कत्तल व वाहतूक सुरुच

दिघोरी/मोठी सहवन क्षेत्रातील प्रकार

वन अधिकाऱ्यांचा तस्करास आशीर्वाद

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा:- वन संवर्धन आणि संरक्षणासाठी शासन प्रयत्नशील असून या करिता अनेक योजनांचे माध्यमातून निधीही उपलब्ध करतो. पण वन विभागातील काही स्वार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे शासनाची उद्देशपुर्ती होत नाही. याचा प्रत्यय सह वनक्षेत्र तथा वनरक्षक बीट दिघोरी/मोठी येथे आला. स्थानिक वन कर्मचारी व अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सरकारी गट क्रमांक ३८३ मधील मौल्यवान सागवान वृक्षाची कत्तल करून पालांदुर येथील एका फर्निचर मार्ट चे नाव असलेल्या चार चाकिने आठवडी बाजाराचे दिवशी सायंकाळचे सुमारास वाहतूक केली जात असल्याचे माहिती असूनही स्थानिक वन कर्मचाऱ्यांसह अधिकारी गप्प असल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक साकोली यांचे कार्यक्षेत्रात असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर, सह वनक्षेत्र तथा वनरक्षक बीट दिघोरी/मोठी येथील सरकारी गट क्रमांक ३८३ लगत असलेल्या शेतजमीन मालकाने या गटावर अतिक्रमण करून या गटातील सागवान झाडे एका लाकूड व्यवसायिकास ऑक्टोबर २०२१ मध्ये विकली होती. तथा ही विक्री केलेली सागवान झाडे तोडून वाहतूक करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडे अर्ज केला. क्षेत्र सहाय्यक दिघोरे व वनरक्षक रुपाली घोनमोडे यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडे पाठविले. झाडे कापण्याची परवानगीही देण्यात आली. सागवान झाडे कापण्यात आली. पण वाहतुकीची परवानगी दिली नसतांना हॅम्बरिंग विना इतरत्र वाहतूक करण्यात येत असल्याचे वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित होताच वन अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले. मौका चौकशी करून पंचनामा केला व कापलेली सागवान झाडे शेतमालकाचे सपृतनाम्यावर ठेवण्यात आले.
ऑनलाईन सातबारा वर या सागवान वृक्षाची नोंद नसतांना वन परिक्षेत्र अधिकारी यांनी झाडे कापण्याची परवानगी दिल्याची माहिती होताच एका सामाजिक संघटनेने सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड यांचे मार्फत तत्कालीन मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्त नागपूर यांना निवेदन पाठवून वनरक्षक, क्षेत्र सहाय्यक, वन सर्वेअर आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. चौकशी चे काम सहाय्यक वन संरक्षक आर.पी. राठोड यांचे कडे सोपविण्यात आले होते. त्यांनी अधीनस्त कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारी जागेतून कापलेली सागवान झाडे मालकीच्याच जागेतील असल्याची क्लीन चिट देऊन संबंधीतास कापलेली सागवान झाडे वाहतुकीची परवानगी दिली. या प्रकाराने आपले कोणी बिघडवू शकत नाही अशा अविर्भावात पालांदूर च्या एका वनतस्कर तथा फर्निचर मार्ट चालकाने या सरकारी गटातील सागवान वृक्षाची कत्तल करून आठवडी बाजाराचे दिवशी सायंकाळचे सुमारास फर्निचर मार्ट चे नाव असलेल्या चार चाकी वाहनातून अवैध तोडलेली बहुमूल्य सागवान झाडे खुलेआम वाहतूक करतो. ही बाब वन अधिकाऱ्यांसह स्थानिक वन कर्मचाऱ्यांनाही माहिती असूनही अर्थकारणामुळे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जाते. असाच प्रकार लाखांदूर वन परिक्षेत्रात सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराने जंगल नामशेष होण्याचे मार्गावर असल्यामुळे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन यात लिप्त वन अधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: