Thursday , December 8 2022
Breaking News

१ लाख लोकांच्या सुरक्षेची जिम्मेदारी ४० पोलिसांवर !

लाखनी पोलिस ठाण्यातील प्रकार

मंजूर पदे भरण्याची मागणी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा:-लाखनी येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांपैकी ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आल्याने कामाचा ताण वाढला आहे. कर्तव्य बजावण्यात अधिक वेळ खर्ची होत असल्याने मानसिक ताण सहन करावा लागतो. तसेच वेळेत दिलेली जबाबदारी पार पाडली गेली काही तर अधिकाऱ्याकडून शिक्षेची भीती तथा कौटुंबिक जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता येत नसल्यामुळे अकारण मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे लाखनी पोलिस ठाण्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. अशी मागणी होत आहे.
लाखनी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात ६१ गावे समाविष्ट असून लोकसंख्या अंदाजे १ लाख आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ५ व साकोली तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. पोलिस ठाण्याचे कामकाज सुचारू पद्धतीने चालावे याकरिता लाखनी शहर , मुरमाडी , गडेगाव , पोहरा , पिंपळगाव , सालेभाटा असे ६ बिटांची निर्मिती करण्यात आली असून जबाबदारी पोलिस हवालदार किंवा पोलिस नायकांवर सोपविण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शांतता व सुव्यवस्था राखणे , जातीय दंगली घडू नये याकरिता प्रयत्न करणे , कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांचे गुन्हे दाखल करून तपास करणे , अवैध धंद्यांचे उच्छाटन करणे , सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे , अती महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणे , गुन्ह्याचा तपास करणे. तथा शासनाने सोपवून दिलेली कर्तव्य बजावणे. ही प्रमुख कामे आहेत.
पोलिस निरीक्षक १ , सहाय्यक निरीक्षक १ , पोलिस उपनिरीक्षक ४ आणि पोलिस कर्मचारी ६० अशी मंजूर पदे असली तरी पोलिस कर्मचाऱ्यांची ४० पदे भरलेली असून २० पदे रिक्त आहेत. ४० पैकी ३ पाळ्यांमध्ये स्टेशन डायरी यात ९ कर्मचारी , न्यायालयीन कर्तव्य २ , चालक ३ याशिवाय साप्ताहिक सुट्टीत दररोज ३ ते ४ पोलिस कर्मचारी असतात. उर्वरित २५ पोलिस कर्मचाऱ्यांना तपसकामे व सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्या तरी कार्यक्षेमतेपेक्षा अधिक काळ कर्तव्य बजावावे लागते. लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे केव्हा अपघात होईल याचा नेम नसतो. या प्रकाराने केव्हा केव्हा तर २४ तासही कर्तव्य बजावावे लागत असल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. अधिक वेळ कर्तव्य बजावण्यात जात असल्यामुळे कुटुंबासही वेळ देता येत नाही. त्यामुळे कौटुंबिक कलह नित्याचीच बाब झाल्यामुळे याचाही पोलिस कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. कमी कर्मचारी संख्येमुळे अवैध धंद्यांची संख्या तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचा विचार करून लाखनी पोलिस ठाण्यात मंजूर असलेली सर्व पदे भरावी अशी मागणी होत आहे. नाही तर ४० पोलिस कर्मचाऱ्यावर १ लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: