Saturday , December 3 2022
Breaking News

आला पावसाळा, बालकांचे आरोग्य सांभाळा !

                जलजन्य आजारांची भीती

          वयक्तिक व परिसर स्वच्छता आवश्यक

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा :- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या डोके वर काढत असतात. ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता यामुळे हाडांशी संबंधित समस्या निर्माण होतात. तसेच दूषित पाणी प्राशन केल्याने कावीळ व इतर जलजन्य आजार होण्याची शक्यता असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लहान बालकांना व जेष्ठ नागरिकांना या ऋतूमध्ये त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे यांचे आरोग्य सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून दररोज काही भागात पाऊस पड़त आहे. हा पाऊस पिकांना जरी चांगला असला तरी आरोग्याच्या दृष्टिने काळजी घेण्याचा हा काळ असतो. या काळात सर्वात जास्त आजार दूषित पाणी व डासांची निर्मिती होऊन आजारात वाढ होत असते. या काळात लहान बालकांची विशेष काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
पावसाळ्यात पचनक्रिया मंदावत असल्याने पोटाचे आजार सुद्धा डोके वर काढत असतात. ढगाळ वातावरण व हवेतील आर्द्रता वाढत असल्याने सांधेदुखी सारखे आजार जेष्ठ नागरिकांना होत असतात. त्यामुळे या काळात लहान बालकासह ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यामध्ये ताप व सर्दी ही लहान बालकांना होणारे हमखास आजार असतात. परंतु सुरुवातीला हे आजार जरी कमी प्रमाणात वाटत असले तरी याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होऊ शकतात. वातावरणातील बदलामुळे प्रत्येकाने आरोग्य जपणे गरजेचे आहे.
यासाठी पालकांनी लहान बालकांचे नियमित लसीकरण करून घ्यावे, तसेच पाणी उकळून प्यावे, सर्दी, ताप यासारखी लक्षणे असल्यास घरच्या घरी उपचार करण्याऐवजी बालरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा. पाच वर्षांखालील मुलांमध्ये ताप, सर्दी झाल्यास त्याचा संसर्ग इतर मुलांना होऊ शकते. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. एस.एस. मरस्कोल्हे यांनी सांगितले.

हि घ्यावी खबरदारी
तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका असतो. या करिता पाणी उकळून प्यावे. वैयक्तिक  व परिसर स्वच्छता राखावी. १ कोरडा दिवस पाळावा, बाहेरचे किंवा शिळे अन्न खाऊ नये. ही खबरदारी घ्यावी.

प्रतिक्रिया
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कावीळ किंवा अतीसाराची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
डॉ. एस.एस. मरस्कोल्हे वैद्यकिय अधिकारी मुरमाडी/तूप

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: